“ ऋतुचक्र ”..!!
वसंत फुलवीत चैत्र बहरतो,
नववर्षाला साद घालुनी
गुढ्या तोरणे आणि पताका,
मुजरा करिती त्रिवार लवुनी !!१!!
एकल्याच त्या वसंत ऋतुची,
वैशाखाशी जुळली नाती
होवुन दोघे सहप्रवासी,
पाठ फिरवुनी निघून जाती !!२!!
उष्णास्त्रांनी सिद्ध होवुनी,
ग्रीष्म अवतरे ज्येष्ठासंगे
उष्माघाते त्रस्त होवुनी,
ज्येष्ठही जाई पळून वेगे !!३!!
आषाढ-वणवा होवुन जेंव्हा,
भूमातेवर घाला घाली
तेंव्हा मग त्या वसुंधरेला,
विश्वामाजी उरे न वाली !!४!!
श्रावणबाळाच्या रूपाने,
तहानलेल्या मातेसाठी
तुंब्यासंगे भाद्रपदाच्या,
श्रावण भटके डोंगरघाटी !!५!!
वर्षा ऋतुचा निर्झर निर्मळ,
झरा झिरपता तया गवसला
गडगडाट मेघांचा ऐकुन,
शरद जरासा सावध झाला !!६!!
अश्विनरूपी बाण सोडुनी,
श्रावण त्याने क्षणात वधिला
कार्तिक बनुनी शरद ऋतू तो,
भूमातेसी पुन्हा बोलला !!७!!
दुःखी पाहुन शरदाला त्या,
अगतिक झाली पुन्हा धरित्री
हेमंताच्या आगमनाने,
आनंदली अन् हसली नेत्री !!८!!
मार्गशीर्ष अन् पौंषहि आला,
चादर पांघरुनी थंडीची
थंडाव्याने हेमंताच्या,
पुरती शमली आग धरेची !!९!!
शिशिरही आला घेवुन संगे,
माघ-फाल्गुना निरोप द्याया
वर्ष संपले वर्ष संपले,
चला आटोपा परत फिरूया !!१०!!
- योगीराज मुळे